Ashok Chavan। भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षाला सुरुंग लावण्याचे काम जोमाने सुरू आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेसही फुटीच्या मार्गावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला आजवरचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. यामुळे नांदेडमधील राजकीय समीकरण बदलले आहे.
नांदेडमधील काँग्रेसच्या तब्बल 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसून कोणालाही सोबत नेणार नाही, असे म्हटले होते.
पण आता त्यांच्या नांदेड मतदारसंघातील तब्बल 55 माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे आता काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे दिसत नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, नांदेड महापालिकेच्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या 81 पैकी 73 नगरसेवक हे काँग्रेसचे होते. यापैकी 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला नांदेड महापालिकेत मोठा धक्का बसला आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता नांदेडमधील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही भाजपाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर आमदारही अशोक चव्हाण यांना पाठिंबा देतात का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.