आठही मतदारसंघातून ऑनलाइनही अर्जाची मिळणार सुविधा
पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांतील इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
आगामी निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत लढविणार असली तरी, पक्षाची तयारी म्हणून आठही विधानसभा मतदारसंघातून अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, इच्छूक उमेदवारांना 1 जुलैपर्यंत शहर पक्ष कार्यालयात अर्ज सादर करता येणार असून यंदा पक्षाकडून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज तसेच अर्जाचे शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.
तुपे म्हणाले, पक्षाकडून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाटी अर्ज मागविण्यात आले आहेत. पक्षाच्या सूचनेनुसार, पुण्यातूनही आठही विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
या अर्जांसोबत खुल्या वर्गाच्या उमेदवाला 5 हजार रुपये अनामत शुल्क आकारण्यात येणार असून मागासवर्गीय तसेच महिला उमेदवारांसाठी हे शुल्क अडीच हजार रुपये असणार असल्याचे तुपे यांनी स्पष्ट केले.