नगर -सावेडी उपनगरातील बहुचर्चित तपोवन रस्त्याच्या विकासकामाचे राजकारण आता भलत्याच वळणावर येवून ठेपले आहे. रस्त्याच्या श्रेयवादातून आज शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उघड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी शिवसेनेच्या माजी महापौरांना थेट शिवराळ भाषेत शिवीगाळ केली. त्यातून प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, दोन्ही बाजूंकडील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मधस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याने अनर्थ टळला. तथापि, या प्रकारातून नवा संघर्ष सुरू झाल्याचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासगीत प्रभातशी बोलताना सांगितले. साधारण तीन किलोमीटर लांबीच्या व सव्वातीन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव असलेल्या या रस्त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे.
यावर्षीच्या जुलै महिन्यात पहिल्याच पावसात तयार झालेला रस्ता खराब झाल्याने त्यावरून आंदोलने पेटली. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 15 जुलै रोजी आंदोलन केले होते. त्यावरुन रस्त्याची तपासणी करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण पथक हजर झाले होते. त्यांनी तपासणी करून रस्त्याचा अहवाल दिला होता. तसेच रस्ता पुन्हा करण्याचे आदेश ठेकेदारास देण्यात आले होते. मात्र, आज पुन्हा रस्त्याची पाहणी करण्यावरुन वाद पेटला. त्यावरुन दुपारी साडेबारा वाजता मोठी गर्दी जमली होती.