बीड – आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे नारळ कोणाला फोडायचे ते फोडू द्या. बीड जिल्ह्यात सध्या घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करत आहे. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती इतरांनी घालू नये, सध्या राष्ट्रवादीत “आयत्या बिळात नागोबा’ होऊन बसण्याचे काम करत आहे, अशी अप्रत्यक्ष टीका भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.
बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून मुंडे भगिनी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. प्रितम मुंडे यांनी पुन्हा एकदा विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे खडेबोल सुनावले आहे.
प्रीतम मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची नार्को टेस्ट करा आणि त्यांना विचारा की, गेल्या आठ वर्षात प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदारकडून कामाच्या बदल्यात काही पैसे घेतले आहेत का? मी कुणाचा चहादेखील घेतला नाही. मी प्रामाणिकपणाने तुमचं काम करण्याचा प्रयत्न करत असून तुमचे प्रश्न सरकार दरबारी मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे “आयत्या बिळात नागोबा’, अशी व्यवस्था झाली आहे. “पंकजा मुंडे पालकमंत्री असतानाही सगळी काम मंजूर झाले आहेत. कोणी कितीही नारळ फोडा, जनता हुशार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.