पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. शुक्रवारी रात्री पाकिस्तानी विमानांनी अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खोस्त आणि कुनात प्रांतांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यांमध्ये 40 हून अधिक अफगाण नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. स्थानिक अफगाण अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी विमानांनी शुक्रवारी रात्री प्रांतातील पेसा मिला आणि मीर सफार भागात जोरदार बॉम्बहल्ला केला.
त्याच बरोबर, प्रांतातील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, खोस्त प्रांतातील स्पेरा जिल्ह्यात हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये दोन कुटुंबातील 33 सदस्य ठार झाले. दरम्यान, कुनार प्रांतातील शाल्टन जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात पाच मुले आणि एक महिला ठार झाली.
पाकिस्तानच्या राजदूताला बोलावले
पाकिस्तानच्या हल्ल्यात 40 जण मारले गेल्यानंतर तालिबान सरकारने या हल्ल्यांचा निषेध केला. याशिवाय तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूताला बोलावून अशा हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली. असे हल्ले करून त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असे तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.