मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकार महायुतीत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवशीपासूनच अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. सातत्याने विविध नेते याबाबत वक्तव्य करत असल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांसह विविध नेत्यांनी याबाबत वक्तव्य केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने आता या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार याची तारीख देखील जाहीर केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. येत्या 10 ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवडणुक पाहता दिली होईल, असेही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच अजितपर्व”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.