मुंबई – सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन सेंटरने इंटरपोल अर्थात एनसीबीने अबू धाबी, केरळ पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अबुधाबीमधील भारतीय दूतावासाशी समन्वय साधत आज रेड नोटिशींची अंमलबजावणी करत दोन आरोपींना भारतात आणले. सीबीआयने त्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून बारकाईने पाठपुरावा केला. पीरू मोहम्मद याह्या खान आणि सुभाष विठ्ठल पुजारी अशी भारतात आणलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
पीरू मोहमद याह्या खान या आरोपीला भारतातील केरळ पोलिसांकडे सोपवण्यात आले. कोट्टायम येथील पाला पोलीस स्टेशनच्या पोलिसांना हवा होता. केरळमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत आणि बलात्कार असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. केरळ पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयला 10 जानेवारीला इंटरपोलने या संदर्भात रेड नोटीस मिळाली होती. इंटरपोल-अबू धाबीच्या समन्वयाने केरळ पोलिसांच्या पथकाने त्याला भारतात आणले.
त्याचबरोबर सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन सेंटरने सुभाष विठ्ठल पुजारीला चीनमधून भारतात आणण्यासाठी मुंबई पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधला. मुंबई पोलिसांच्या पथकाने आज त्याला परत आणले आहे.
मुंबई पोलिसांना अनेक गुन्ह्यांप्रकरणी तो हवा होता. खुनाचा प्रयत्न, खंडणी, गुन्हेगारी धमकी, शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत (मकोका) त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. सीबीआयच्या विनंतीवरून १४ फेब्रुवारी २०१२ रोजी इंटरपोल कडून या संदर्भात रेड नोटीस जारी करण्यात आली होती.