संयुक्त राष्ट्र – गाझामध्ये तात्काळ युद्धबंदी लागू करण्यात यावी, अशा अर्थाचा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रथमच आज मंजूर करण्यात आला. यापूर्वी अशा अर्थाचा ठराव करण्यासाठी अनेक प्रस्ताव सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आले होते. मात्र सुरक्षा परिषदेच्या काही सदस्यांकडून या ठरावांबाबत नकाराधिकार वापरला गेला आणि प्रस्ताव फेटाळले गेले होते.
त्यामुळे तात्कळ युद्धबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सुरक्षा परिषदेमध्ये मंजूर होऊ शकला नव्हता. आज पहिल्यांदात तात्काळ युद्धबंदी लागू करण्याची ठराव सुरक्षा परिषदेकडून मंजूर झाला आहे. ठराव मंजूर झाल्याबरोबर सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
सुरक्षा परिषदेच्या सर्व १४ सदस्य देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले आणि हमासविरोधात इस्रायलने गाझापट्टीमध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाई दरम्यान तात्काळ युद्धबंदी लागू करण्याची मागणी अधोरेखित केली.
हमास आणि इस्रायलदरम्यान तह केला जावा आणि त्याद्वारे स्थायी युद्धबंदी लागू केली जावी, असे या ठरावामध्ये म्हटले आहे. इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याच्यावेळी ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची हमास आणि अन्य दहशतवादी संघटनांनी त्वरित सुटका करावी, असेही या ठरावामध्ये म्हटले आहे.
कायम युद्धबंदी या ठरावातील शब्दप्रयोगातील कायम शब्दाला रशियाने अखेरच्या क्षणी आक्षेप घेतला. हा शब्द हटवण्यात यावा, अशी मागणी रशियाने केली. या दुरुस्तीवर सुरक्षा परिषदेत मतदान घेण्यात आले, मात्र रशियाची ही दुरुस्ती मंजूर होऊ शकली नाही.
सुरक्षा परिषदेत मंजूर झालेल्या या ठरावाचा मसुदा अल्जेरिया, सुरक्षा परिषदेतील सध्याचे सदस्यत्व असलेल्या अरब गट, स्लोव्हेनिया आणि स्वीत्झर्लंड या देशांनी मिळून तयार केला होता. गाझामध्ये युद्धबंदी लागू करण्याची मागणी करणारे ठराव अमेरिकेने पूर्वी नकाराधिकार वापरून फेटाशळून लावले होते.
मात्र रफाह या दक्षिणेकडील अखेरच्या शहरावर लष्करी कारवाई करण्याची योजना इस्रायलने आखल्यामुले अमेरिका देखील इस्रायलवर नाराज आहे. अमेरिकेच्या भूमिकेत झालेला हा बदल सोमवारी सुरक्षा परिषदेत झालेली चर्चा आणि मतदानाच्यावेळी दिसून आला. युद्धबंदीबाबतचे पूर्वीचे ठराव अमेरिकेने फेटाळले आणि इस्रायलला पाठिंबाही दिला होता.
मात्र आज अन्य देशांबरोबर अमेरिकेनेही तात्काळ युद्धबंदीच्या मागणीला पाठिंबा दिला. यापूर्वी सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या ठरावांमध्ये हमासच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला नव्हता. म्हणून या ठरावांवरून इस्रायलने सुरक्षा परिषदेवर टीका केली होती.
आज मंजूर झालेल्या या नवीन ठरावामध्ये इस्रायल आणि हमास दरम्यान कतार येथे अमेरिका आणि इजिप्तच्या मदतीने सुरू असलेल्या चर्चेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हमासच्या ताब्यातील इस्रायलींच्या सुटकेच्या मागणीसाठी ही चर्चचा सुरू करण्यात आली आहे. या चर्चेसाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात युद्धविराम स्वीकारण्यात आला आहे.