नवी दिल्ली – गाझा पट्टीमध्ये इस्रायल पुरेशी मदत पोहोचू देत नसल्याचा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टनिओ गुटरेस यांनी केलेला आरोप इस्रायलने सपशेल फेटाळून लावला आहे. गाझामध्ये मानवतावादी मदत पोचण्यासाठी इस्रायलकडून अडथळे केले जात असल्याचा आरोप गुटरेस यांनी केला होता. मात्र हा आरोप इस्रायलची मदत संस्था कोगॅट अर्थात कओऑर्डिनेशन ऑफ गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटीस इन द टेरिटोरीस जुडिया, ऍमोना ऍन्ड टूवर्डस द गाझा स्ट्रीपने फेटाळला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीकडून मदत दिली जाते आहे, असे इस्रायलच्या एजन्सीने म्हटले आहे. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मदत वितरणाच्या ट्रकचे फोटो आणि व्हिडीओ देखील एक्सवर प्रसिद्ध केले गेले आहेत.
हे ट्रक इजिप्तमध्ये तपासले जात असून अद्याप इस्रायलच्या सीमेवरून पुढे गेलेले नाहीत. मदत वितरणासाठी संयुक्त राष्ट्राची यंत्रणाच अपुरी आहे. त्यासाठी इस्रायलला दोष दिला जाऊ नये, असे इस्रायलच्या एजन्सीने म्हटले आहे.
इस्रायल सीमेजवळ केरेम शोलोम बॉर्डर क्रॉसिंगजवळ मदत साहित्याचे १४२ ट्रक प्रतिक्षेत असल्याचे इस्रायलच्या एजन्सीने म्हटले आहे. हे ट्रक गाझा, इस्रायल आणि इजिप्त दरम्यानच्या मोकळ्या भागांमध्येच आहेत. मात्र ट्रकच्या लांबच लांब रांगा गाझा पट्टीजवळ उभ्या असून इस्रायलने या ट्रकला प्रवेश नाकारला असल्याचे गुटरेस यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.