पारगाव, (वार्ताहर) – दौंड तालुक्यात सध्या दुष्काळ अनुदान मिळण्यासाठीचे अर्ज जमा करण्याची मुदतवाढ मिळाली असून मंजूर शेतकर्यांचे केवायसी भरण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे महा ई सेवा केंद्रावर शेतकरी वर्गाची गर्दी होत असली तरी मंजूर अनुदान बँक खात्यावर वर्ग होण्यासाठी केवायसी करावी लागते व ती करत असताना अनेकांच्या हाताचा अंगठा उमटत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
काही अपंग, अर्धांगवायू झालेले तर काहींच्या जादा वयोमानानुसार बोटाचा ठसा उमटत नाही. त्यामुळे या लोकांचे अनुदान बँक खात्यात वर्ग होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. दुसरा पर्याय म्हणून ओ.टी. पि. हा एक पर्याय उपलब्ध आहे.
परंतु ते पोर्टल पूर्ण लोडिंगने चालत असून रिटर्नचा ओटीपी येत नाही. मागील वेळेस कर्जमाफीच्या वेळी यास पर्याय म्हणून केवायसी नॉट पॉसिबल हा एक तिसरा पर्याय होता. वयस्कर व अपंग शेतकरी यांना वेळोवेळी महा इ सेवा केंद्राच्या ठिकाणी आणणे अवघड असल्याने शासनाने यासाठी पर्याय उपलब्ध करून लाभार्थी शेतकर्यांना अनुदान प्राप्त करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.