रायपूर – छत्तिसगढमध्ये काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एका अभियंत्याचे अपहरण केले. त्या अभियंत्याच्या धाडसी पत्नीने पतीच्या शोधासाठी चिमुकल्या लेकीसह थेट नक्षलींचा अड्डा असणारे घनदाट जंगल गाठले. छत्तिसगढच्या बिजापूर जिल्ह्यातील एका नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू आहे. त्या कामाचे कंत्राट एका खासगी कंपनीला मिळाले आहे.
त्या कंपनीत कार्यरत असणारे अभियंता अशोक पवार आणि कामगार आनंद यादव यांचे नक्षलींनी अपहरण केले. त्या घटनेमुळे दोघांचेही कुटूंबीय हादरले. पवार यांच्या पत्नी सोनाली यांनी पतीच्या सुटकेसाठी नक्षलींना भावनिक आवाहन करणारा व्हिडीओ सोशल मीडियावरून जारी केला.
दोन लहान मुलींचा विचार करून माझ्या पतीची सुटका करा, अशी विनंती सोनाली यांनी केली. मात्र, त्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. सोनाली यांनी पाच वर्षांच्या थोरल्या लेकीला कुटूंबासमवेत ठेवले. अवघ्या अडीच वर्षांच्या धाकट्या लेकीला घेऊन त्या धडकी भरवणाऱ्या अबूझमाड जंगलात पोहचल्या. त्यासाठी त्यांनी स्थानिक रहिवाशांची आणि पत्रकारांची मदत घेतली.
सोनाली यांचा भावनिक व्हिडीओ नक्षलीपर्यंत पोहचला की नाही याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, तो व्हिडीओ नक्षलींपर्यंत पोहचून बहुधा त्यांचे हृदय द्रवले असावे असे म्हणण्यास जागा आहे. कारण, कुठलीही इजा न पोहचवता नक्षलींनी पवार आणि यादव या दोघांचीही मंगळवारी सुटका केली. घरी पोहचण्यासाठी नक्षलींनी दोघांना प्रत्येकी 2 हजार रूपये दिले. मानसिक धक्का बसल्यामुळे त्या दोघांनाही सध्या एका ठिकाणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.