नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारासाठी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या समर्थकांनी प्रचारामध्ये चक्क वाघ आणि सिंहांनाही सहभागी करून घेतले होते. मंगळवारी लाहोरमध्ये झालेल्या प्रचारामध्ये या वन्य प्राण्यांना आणण्यात आले होते. हे वाघ आणि सिंह म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाचे प्रतिनिधी असल्याचे या समर्थकांकडून सांगण्यात येत होते. अशाप्रकारे वन्य पशूंना निवडणूक प्रचारामध्ये सहभागी करून घेतले जाणे हे केवळ पाकिस्तानमध्येच बघितले जाऊ शकते, अशी टीका मात्र निरीक्षकांकडून केली जाऊ लागली आहे.
संसदेच्या निवडणूकीसाठी प्रचार करताना नवाझ शरीफ याचंच्या समर्थकांनी लोखंडी पिंजऱ्यांतून चक्क वाघ आणि सिंहांना आणले होते. पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते या वन्य प्राण्यांबरोबर चक्क सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत होते.
पीएमएल-एन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून यापूर्वीही अशाप्रकारे वाघ आणि सिंहांना निवडणूक प्रचारामध्ये सहभागी करून घेतले गेले आहे. तथापि, निवडणूक प्रचारामध्ये कोणत्याही वन्य पशूला आणण्यात येउ नये, अशी सूचना नवाझ शरीफ यांनी दिली होती. त्यानुसार पीएमएल-एनच्या रॅलीसाठी त्याच्या एका समर्थकाने आणलेला खरा सिंह परत नेण्यात आला आहे, असे पीएमएल-एनच्या नेत्या मरियम औरंगजेब म्हणाल्या.
मोहिनी रोड येथील प्रचाराच्यावेळी खरा सिंह आणण्यावर नवाझ शरीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानुसार सिंहाला परत पाठवण्यात आले.मंगळवारी नवाझ शरीफ यांच्या निवडणूक प्रचार फेरीमध्ये मरियम देखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टिकरण दिले.