चंडिगढ -पंजाबमधील कॉंग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्याचे राजकीय मैदान सोडण्याची त्यांची तयारी नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी राजकीय पक्ष सज्ज होऊ लागले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर, सिद्धू यांना पत्रकारांनी लोकसभा निवडणूक लढवण्याविषयीचा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. पंजाबमध्ये मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाली.
त्यामध्ये आपची सरशी झाल्याने कॉंग्रेसला त्या राज्याची सत्ता गमवावी लागली. त्या निवडणुकीत सिद्धू यांनाही पराभूत व्हावे लागले. त्यानंतर सिद्धू यांना कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले.