नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकांत तीन राज्यांमध्ये पीछेहाट झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातून कॉंग्रेसने मध्यप्रदेशात ज्येष्ठ नेते कमल नाथ यांच्या जागी तरूण नेते जीतू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तर, छत्तिसगढ विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी ज्येष्ठ नेते चरणदास महंत यांचे नाव निश्चित केले.
विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी करण्याच्या विश्वासानंतरही कॉंग्रेसच्या हाती मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढमध्ये अपयश आले. अशात राजकीय महासंग्राम म्हणून पाहिली जात असलेली लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तीन राज्यांत कॉंग्रेस खांदेपालटाचे पाऊल उचलेल, असे मानले जात होते. त्या अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे.
मध्यप्रदेशात नामुष्कीजनक पीछेहाट झाल्यानंतर ७७ वर्षीय नाथ यांना कॉंग्रेस श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार, नाथ यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन राजीनामा सादर केला.
आता पक्षाने ५० वर्षीय पटवारी यांच्याकडे धुरा सोपवली आहे. ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. कॉंग्रेसने मध्यप्रदेश विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारीही तरूण नेत्याकडे सोपवली आहे. त्यानुसार, ४९ वर्षीय उमंग सिंघार विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत दिसतील.