संडे स्पेशल: निसर्गरम्य पिस्त्याची कोंड

अशोक सुतार

संध्याकाळी म्हादईच्या जंगलात आम्ही म्हादई नदीच्या किनारी एका मैदानात थांबलो. आम्हाला जेवणाची तयारी करायची होती. मित्रांनी स्वयंपाक करण्यासाठी जंगलातील सुकलेले बांबू, लाकडे, वाळलेला पाला जमा केला. तीन दगड मांडून आमचा स्वयंपाक सुरू झाला. म्हादई नदी शांतपणे वाहत होती. म्हादई नदीचा उगम कर्नाटकात देगाव ता. खानापूर येथे झाला असून ही नदी जंगलातून पुढे गोव्यात जाते. म्हादई नदीसाठी पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी मोठा लढा दिला. कर्नाटक राज्य ही नदी कर्नाटकातच वळवू पाहात होते. परंतु राष्ट्रीय वन्यजीव समितीचे सदस्य असलेल्या केरकर सरांनी ते न होण्यासाठी न्यायालयात लढा दिला. त्यांचा लढा सुरू आहे.

रात्री अंधारात उजेड हवा म्हणून काही लाकडे एकत्र करून पेटवली. जंगलातील जेवणाला काही औरच चव असते! आम्ही जेथे झोपलो होतो, त्याभोवती अग्नी पेटत होता. विठ्ठल म्हणाला, रात्री अग्नी पेटवला तर जंगलातील जनावरे जवळ येणार नाहीत. जंगलातील पशु-पक्ष्यांचा आवाज शांत झाला होता. जंगलातील रात्र अनुभवणे खूपच रोमांचकारी आहे. सकाळी सहा वाजता जाग आली, थंडगार हवेची झुळूक येत होती. पक्षी किलबिलत होते. रात्री भीतीदायक वाटणारे जंगल आता सुहास्यवदनाने आमचे स्वागत करीत होते.

आम्ही पुढील प्रवासाला निघालो. रस्त्याने प्रवास करत असताना विठ्ठल यांनी दुचाकी थांबवली. त्यांनी रस्त्यावर वाघाच्या पावलांचे ठसे दाखवले. वाघ नुकताच रस्त्यावर येऊन गेला असावा. विठ्ठल यांचा जंगलातील प्राण्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. थोडे पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितले की, इथे जवळपास गव्यांचा कळप आहे. कारण गव्यांना काही विशिष्ट गंध असतो.

आम्ही कर्नाटकच्या हद्दीत पुन्हा म्हादई नदी ओलांडून पिस्त्याची कोंड येथे आलो. जवळच पिस्तेश्‍वराचे छोटे मंदिर आहे. पिस्तेश्‍वराचे दर्शन घेतले. “पिस्त्याची कोंड’ म्हणजे एक मोठे जलकुंड आहे. येथील दगडांना विविध पोत आहेत. जलकुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे यात चार फुटांचे अनेक मासे आहेत. माशांचा आकार हेलिकॉप्टरसारखा असून येथील पाणी स्वच्छ, पारदर्शक असल्यामुळे मासे सहज दिसतात. पिस्त्याची कोंड हे पिस्तेश्‍वराच्या अधिन असल्याचा समज आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी पिस्त्याची कोंड येथील मासे कधीच खात नाहीत. जंगलातील माणसे असे संकेत पाळतात, त्यामुळे निसर्ग संरक्षण होत आहे. म्हादई जंगलातील पशु-पक्ष्यांचा अधिवास नदी व जंगलामुळे अबाधित आहे.(क्रमशः)

Leave A Reply

Your email address will not be published.