इंदापूर : पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात 221 ग्रामपंचायतींपैकी 131 ग्रामपंचायतींवरवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंदापूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 20) ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष गारटकर बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील आणि सर्वच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार पदाधिकारी हे गाव पातळीवर तळागाळापर्यंत काम करत असतात. त्यांच्या जनसंपर्कामुळे व सदैव विकासकामे करत जनतेशी जोडलेली नाळ आणि केलेल्या विकास कामांमुळेच हे चांगल्या पद्धतीचे यश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपादित झाले आहे.
बारामतीतील 13 पैकी 13, मुळशी तालुक्यात 11 पैकी 11, खेड तालुक्यामध्ये 23 पैकी 18 जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व 4 ग्रामपंचायती संमिश्र, आंबेगाव तालुक्यात 21 पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी तर 3 ग्रामपंचायती संमिश्र लागल्या आहेत. शिरूर तालुक्यात चार पैकी दोन राष्ट्रवादी,वेल्हा तालुक्यामध्ये 28 पैकी 13 राष्ट्रवादीच्या तर 6 ग्रामपंचायती संमिश्र, भोर तालुक्यामध्ये 54 पैकी 24 राष्ट्रवादी आणि 7 ग्रामपंचायती या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराच्या, जुन्नर तालुक्यामध्ये 16 पैकी 10 राष्ट्रवादी व 1 संमिश्र, मावळ तालुक्यामध्ये 9 पैकी 7 , इंदापूर तालुक्यामध्ये 26 पैकी 12 आणि संमिश्र तीन, हवेली तालुक्यामध्ये 7 पैकी 3 , दौंड तालुक्यामध्ये 7 पैकी 1 ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विचाराच्या आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.