पुणे – कोलकाता येथे सुरू असलेल्या ८५ व्या आंतरराज्य आणि ज्युनिअर गट (१९ वर्षांखालील) राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याची अव्वल टेबल टेनिसपटू पृथा वर्टीकर हीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
कोलकत्यातील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम लढत झाली. यांत महाराष्ट्राने हरियाना संघावर ३-० असा विजय मिळविला. पहिल्याच लढतीत पुण्याच्या पृथाने हरियानाच्या प्रिथोकी चक्रवर्तीला ११-७, ११-६, ८-११, ११-८ असे पराभूत करत महाराष्ट्राचे खाते उघडले.
त्यापाठोपाठ सायली वाणीने हरियानाच्या सुहाना सैनीचा ११-९, ८-११, ११-७, ११-१३, ११-९ असा पराभव केला आणि महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. आव्हान राखण्यासाठी तिसऱ्या लढतीत हरियानाला विजय गरजेचा होता. मात्र, तनिषा कोटेचाने हरियानाच्या सान्वीला १०-१२, ११-४, ११-५, ११-७ असे पराभूत केले आणि महाराष्ट्राच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
गेल्यावर्षी झालेल्या ८४ व्या आंतरराज्य स्पर्धेत महाराष्ट्राने हरियानाला ३-१ असे नमवताना विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्यावर्षी विजेतेपद पटकावले.