नवी दिल्ली – आसाममधील मोरीगावमध्ये गुरुवारी एक अवैध मदरसा प्रशासनाने जमीनदोस्त केला. हा मदरसा मुफ्ती मुस्तफा याचा होता. नुकतीच मुस्तफाला अटक करण्यात आली आहे. मुफ्ती मुस्तफा याच्यावर जिहादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मोरीगाव येथील जमातुल मदरसा जो नुकताच मुफ्ती मुस्तफाच्या अटकेनंतर सील करण्यात आला होता. आज सकाळी त्यावर बुलडोझर चालवून पाडण्यात आला आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा म्हणाले की, या वर्षी मार्चपासून आसाममध्ये पाच दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे. यात मोरीगांवचाही समावेश आहे. यामध्ये मुस्तफासह दोघांना अटक करण्यात आली. मदरसा आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्यांतर्गत पाडण्यात आला. त्याला स्थानिक पंचायत किंवा जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी नव्हती आणि मुस्तफाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेचा भाग म्हणून मिळालेल्या जमिनीवर मदरसा बांधण्यात आला होता.
दहशतवादी कारवायाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुस्तफाचे शिक्षण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात झाले आहे. त्याने भोपाळमधून इस्लामिक कायद्यात डॉक्टरेट मिळवली आहे. मुस्तफाला अटक केल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याचा मोबाईल फोडला. मात्र पोलिसांना मोबाईलचा मदर बोर्ड जप्त करण्यात यश आले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मुफ्तीने 43 विद्यार्थ्यांसह मदरसा स्थापन केला होता. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने त्या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश दिला आहे.