बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी सातत्याने वर्चस्व राखले आहे. त्यात भर घालताना अनुभवी वेटलिफ्टर गुरदीप सिंग याने 109 पेक्षा जास्त किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाला गवसणी घातली. गुरदीपने मिळवलेल्या पदकामुळे भारताची वेटलिफ्टिंगमधील पदक संख्या 10 पदकांवर आली आहे.
गुरदीपने एकूण 390 किलो वजन उचलले. गुरदीपने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक विजेतेपद स्पर्धेत 388 किलो वजन उचलले होते. त्यामुळे त्याच्याकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची आशा होती.
गुरदीपने आपल्या गटात स्नॅचमध्ये 167 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 167 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. तिसऱ्या प्रयत्नात गुरदीपने वजन वाढवत 173 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला त्यात यश आले नाही. त्यामुळे स्नॅच फेरीत गुरदीप इंग्लंडच्या गॉर्डन शॉ सोबत संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
🥉GURDEEP WITH BRONZE 🥉
With a total lift of 390 Kg in Men’s 109+ Kg 🏋️♂️ Gurdeep bags bronze🥉
Proud of you Champ!! Have a look at medal ceremony 🏅#Cheer4India 🇮🇳#India4CWG2022@PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @ddsportschannel @SonySportsNetwk @CGI_Bghm pic.twitter.com/PkkFWgBl8p
— SAI Media (@Media_SAI) August 4, 2022
स्नॅच प्रकारातील प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे गुरदीपने जास्त मेहनत घेत क्लीन आणि जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात 207 किलो वजन उचलले. त्यामुळे त्याचे एकूण वजन 374 किलो झाले. दुसऱ्या प्रयत्नात 215 किलो वजन उचलण्यात अपयश आले होते. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात गुरदीपने 223 किलो वजन यशस्वीरित्या उचलत स्पर्धा विक्रम साकार करत एकूण 390 किलो वजन उचलले व ब्रॉंझपदक प्राप्त केले.