पणजी :- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मी प्रथमच सहभागी झाले आहे. या पहिल्याच प्रयत्नात मला कांस्यपदक मिळाले, ही माझ्या दृष्टीने भावी यशाची पायाभरणीच आहे, असे महाराष्ट्राची कुस्तीगीर भाग्यश्री फंडने सांगितले.
भाग्यश्रीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीच्या 62 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. गतवर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला सहभागी होत आले नाही. यंदा मात्र तिला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी तिने भरपूर मेहनत केली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण शिबीरही आयोजित करण्यात आले होते या शिबिरातही तिला भाग घेण्याची संधी मिळाली त्याचाही फायदा दिला झाला.
National Games 2023 (Hockey) : महाराष्ट्राचा पश्चिम बंगालवर दणदणीत विजय
वीस वर्षीय भाग्यश्रीने आतापर्यंत कनिष्ठ गटाची जागतिक स्पर्धा, जागतिक कॅडेट स्पर्धा व 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्यापैकी कॅडेट स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते. आता वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्याचे भाग्यश्रीचे ध्येय आहे. त्यासाठी भरपूर मेहनत करायची तिची तयारी आहे आणि आई-वडिलांचाही तिला भरपूर पाठिंबा मिळत आहे.