नगर – महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडाळाचे द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन रविवार दि. 21 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे भाजीपाला बाजार आवारात आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी हमाल मापाडी महामंडळाचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबा आढाव हे असतील.
तसेच माजीमंत्री धनंजय मुंडे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिवेशन स्वागत समितीचे अध्यक्ष संग्राम जगताप यांनी दिली. हमाल मापाडी कामगारांचे लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या कार्यकाळात नगरला हे अधिवेशन घेण्यात आले होते. यावेळी अधिवेशनाचे संयोजक नगर जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, राज्य महामंडाळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, डॉ.हरीश धुरट, विकास मकदूम, सरचिटणीस सुभाष लोमटे, सहचिटणीस अप्पा खताळ उपस्थित होते.
या अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व जिल्ह्यातील बाजार समितीत काम करणारे हमाल, मापाडी प्रतिनिधी तसेच दिल्ली, राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेश उत्तर प्रदेश राज्यातील प्रतिनिधी येणार असल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले. माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, हमाल मापाडी यांना पेन्शन योजना सुरु करावी, कामगार खात्यात व माथाडी मंडळात मोठ्या प्रमाणात ज्या जागा रिक्त आहेत. त्या तातडीने भराव्यात आणि माथाडी मंडळाला त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार स्वतंत्र अध्यक्ष व सचिव नियुक्त करावा यासाठी या अधिवेशनाद्वारे सरकार दरबारी मागणी करण्यात येणार आहे.