पुणे – काश्मीर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 10 फूट पुतळ्याचे पूजन येथे नुकतेच करण्यात आले. “आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने “पुण्याई पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. यावेळी मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, पंडित वसंतराव गाडगीळ, विश्वस्त अभयराज शिरोळे आदी उपस्थित होते. “रॉयल बुलेटिरियस’ च्या बाइकर्सने यावेळी बुलेट चालवून मानवंदना दिली. स्वामी ओम ढोल ताशा पथकाने वादन केले.
शहीद संतोष महाडिक आणि स्वाती महाडिक यांची कन्या कार्तिकी महाडिक आदी यावेळी उपस्थित होते.
अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, सतारवादक उस्ताद उस्मान खॉं, उज्वल निरगुडकर, दुर्गसंवर्धक श्रमिक गोजमंगुडे, वैशाली आणि रूपाली हॉटेल प्रमुख विश्वजीत जाधव, mपुरातत्त्व विभाग सहायक संचालक डॉ. विलास वहाने आदींना पुण्याई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काश्मीरमध्ये जवानांना प्रेरणा देण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुण्यातील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला ही पुणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. 20 व्या शतकात कोणत्याही लोकशाही राष्ट्राला अभिमान वाटावा, असे राष्ट्र शिवाजी महाराजांनी निर्माण केले. छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व हेच भारतीयांचे राष्ट्रीयत्व आहे, असे बलकवडे म्हणाले.
“आम्ही पुणेकर’ संस्थेची संकल्पना
शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून मिळावे. महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत – पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ती स्थापन करण्यात येणार आहे.