14th Women’s National Hockey Championship 2024 in Pune :- हॉकी मणिपूरने हॉकी उत्तराखंडवर 11-2 असा सहज पराभव करताना सलग तिसर्या विजयासह सलग पूल जीमधून १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम आठ संघांमध्ये धडक मारली. आता बाद फेरीत त्यांची गाठ हॉकी महाराष्ट्रशी पडेल. क्वार्टरफायनल फेरी बुधवारपासून खेळली जाणार आहे.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या हॉकी मणिपूरने मंगळवारी हॉकी उत्तराखंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ब्रम्हचारीमायुम सरिता देवीचे (आठव्या आणि २४ व्या मिनिटाला) मैदानी गोल, प्रभलीन कौरचे (१४ आणि ४५ व्या मिनिटाला, पीसी) पेनल्टी कॉर्नरवरील आणि चिंगशुभम संगई इबेनहाईचे (५३ व्या आणि ६० व्या मिनिटाला, पीसी) एका पेनल्टी कॉर्नरसह दोन गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
हॉकी मणिपूरचा पूल जी मधून सलग तिसरा विजय आहे. त्यांनी एकूण ९ गुणांसह आरामात बाद फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवणारा तो आठवा आणि शेवटचा संघ ठरला. पूल जी मधील इतर सामन्यामध्ये, हॉकी कर्नाटकने दादरा नगर आणि हवेली आणि दीव आणि दमन हॉकीचा १३-० असा धुव्वा उडवला. कृतिकाचे (१५,२६ व्या मिनिटाला-पीसी, ५६ व्या मिनिटाला-पीसी, ५६ व्या मिनिटाला-पीसी) चार गोल करताना त्यात सिंहाचा वाटा उचलला. एम. जी. याशिकाने (२० व्या मिनिटाला-पीसी, ३८ व्या मिनिटाला, ५८ व्या मिनिटाला-पीसी) तीन गोल करताना तिला चांगली साथ दिली.
पूल एच मध्ये हॉकी हिमाचल आणि हॉकी राजस्थान यांच्यातील लढत ४-४ अशी बरोबरीत सुटली. हॉकी हिमाचलकडून धापा देवीने चौथ्या आणि ४८ व्या मिनिटाला असे दोन गोल केले. रितू आणि भूमिका चव्हाणने प्रत्येकी दोन गोल केले. हॉकी राजस्थानकडून रीना सैनीने ४१ आणि ४८ व्या मिनिटाला तसेच बलवंत रीना कंवरने २५ व्या आणि ४० व्या मिनिटाला गोल करताना प्रतिस्पर्ध्यांना बरोबरीत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.