मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामार्फत “इमरजिंग ट्रेन्डस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी” या विषयावर एक दिवसीय नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यात ८४ जणांनी सहभाग नोंदवला असून १४ संशोधन पेपरची निवड करून, कॉन्फरन्स आय.एस. बी. एन. प्रोसिडिंग प्रसिद्ध करण्यात आले. तसेच २५ संशोधन पेपरच्या ऍबस्ट्रॅक्ट पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कॉन्फरन्सचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश परदेशी व सीमेट पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधीर अरबूज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सदर कॉन्फरन्ससाठी महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सदाशिव बोलभट, कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विलास सदाफळ, रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंदराव काळे व सहकारी प्राध्यापक, संशोधक, रसायनशास्त्र विषयाचे विद्यार्थी व विविध महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले होते.
उद्घाटनपर भाषणामध्ये प्रा. डॉ. सतीश परदेशी यांनी भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान याविषयाचासद्यस्थितीचा आढावा घेऊन झिंक ऑक्साईड व त्यांचे उपयोगिता या विषयावर प्रकाश टाकला. तसेच डॉक्टर सुधीर अरबूज यांनी ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन युजिंग सेमीकंडक्टर इन फोटो कॅटेलीसिस या विषयावर व्याख्यान दिले.
या कॉन्फरन्समध्ये १२ संशोधक विद्यार्थ्यांनी आपले ओरल प्रेझेंटेशन केले व २५ संशोधक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन करून आपले संशोधनाचे सादरीकरण केले. संध्याकाळच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. अतुल चासकर आय.सी.टी. मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. चासकर यांनी आपले व्याख्यानामध्ये इमर्जिंग ट्रेंड्स ऑरगॅनिक लाईट इमेटिंग डायोडस या विषयावर विवेचन करून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व विशद केले.
८४ जणांचा सहभाग
कॉन्फरन्ससाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थी असे एकूण ८४ जणांनी सहभाग नोंदवला. प्रा.डॉ.श्याम मिसाळ, प्रा. डॉ. रमेश गावडे, प्रा. डॉ.संतोष शिंदे, प्रा. डॉ. अरुण वळवी व इतर सर्व सहकारी प्राध्यापकांचे योगदान लाभले. कॉन्फरन्स यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. ए .ए काळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन .एस गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.