नाशिक – महिला तहसीलदार डाॅ. राजश्री अहिरराव यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज मंगळवारी त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावण्णकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अहिरराव यांच्या भाजप प्रवेशामुळे देवळाली मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्यास अहिरराव इच्छुक आहेत.
डाॅ. अहिरराव यांनी गेली अनेक वर्ष महसूल विभागात सेवा बजावली आहे. त्यांनी नाशिक तहसीलदारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. राजीनामा देण्याआधी त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या तहसीलदारपदाची जबाबदारी होती.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी डाॅ. अहिरराव यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी त्या वेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर सातत्याने त्यांनी देवळाली मतदारसंघात लोकांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला. ग्रामीण भागातील रहिवाशांना आवश्यक मदत करणे, सरकारी कार्यालयांत अडकलेली कामे मार्गी लावून देणे, त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देणे अशी मदत त्यांच्याकडून सुरु होती.
त्यानंतर आता मतदारसंघाची बांधणी आणि निवडणुकीची तयारी करता यावी, यासाठी नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याचा निर्णय डाॅ. अहिरराव यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून त्यांना आगामी विधानसभेचे तिकिट मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.