women voters – देशातील अर्ध्याहून अधिक मतदारसंख्या असलेल्या महिलांना पक्षाबरोबर जोडून घेणे आणि त्यांना केंद्र सरकारने कायदा केलेल्या महिला आरक्षणाचे लाभ समजावून देणे ही दोन उद्दीष्ट्ये डोळ्यासमोर ठेवत भाजपाने आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिला-केंद्रित धोरण निश्चिती करण्याचे ठरवले आहे.
सहसा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातूनच सध्या महिलांना उमेदवारी दिली जाते. मात्र, समाजाच्या सर्व स्तरांतील, घटकांतील कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या महिलांना सक्षम लोकप्रतिनिधी बनवण्यासाठी भाजपा विशेष मोहिम उघडणार असल्याचे समजते. याप्रश्नी भाजप महिला मोर्चाने मंगळवारी पक्ष मुख्यालयात बैठक घेतली. त्यात भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ, केंद्रीय मंत्री कौशल किशोर, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर सहभागी झाले होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला होता, याकडेही पक्षाच्या केंद्रिय महिला आघाडीने लक्ष वेधले आहे. विशेषत: मध्य प्रदेशात महिलांनी ज्या प्रकारे उत्साहाने सहभाग घेतला, त्याचे परिणामही दिसून आले.
त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीत देशभरातील महिलांना सहभागी करून घेण्यासाठी पक्षाने सविस्तर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील बचत गटांशी संपर्क साधून विविध योजनांच्या माध्यमातून नवीन सदस्य जोडण्याचे काम भाजप महिला मोर्चाला देण्यात आले आहे.
महिला बचत गटांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व कार्यक्रमांची माहिती व्हावी यासाठी या बैठकीत धोरण आखण्यात येत आहे. यानंतर भाजप महिला मोर्चाच्या एका मोठ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत.
नुकतीच सहा जानेवारी रोजी भाजपने आपल्या सर्व पक्षीय आघाड्यांची बैठक घेतली आणि नुकत्याच केलेल्या कामाचा आढावा घेतला. भाजपचे सरचिटणीस बी.एल.संतोष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश वरिष्ठ नेतृत्वाने दिले आहेत.