नाशिक – पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी पोलीस दलासह नाशिकचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन होण्याचा रेकॉर्ड केला आहे. अश्विनी देवरे या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदी कार्यरत आहेत. कझाकिस्तानमध्ये आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धकांबरोबर देवरे देखील सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही सर्वात कठीण स्पर्धा मानली जाते.
स्पर्धेतील 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग व 42.2 किलोमीटर धावणे अशी स्पर्धा असून ती एकूण 17 तासांमध्ये पूर्ण करावी लागते. मात्र हे तीन टप्पे अश्विनी देवरे यांनी 14 तास 24 मिनिटे 46 सेकंदात पूर्ण केले. यात 2 तास एक मिनिट 42 सेकंदात स्विमिंग, 7 तास नऊ मिनिटे 30 सेकंदात सायकलिंग व 4 तास 53 मिनिटे 32 सेकंदात रनिंग पूर्ण करत देवरे यांनी आयर्नमॅन होण्याचा मन मिळवला. स्पर्धा जिंकल्यानंतर अश्विनी देवरे याना विशेष मेडलने गौरविण्यात आले.
देवरे या पोलीस दलात 2019 भरती झाल्या होत्या. सध्या त्या नाशिक रोड पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. पोलीस खात्यातील कर्तव्य आणि संसारांचा गाडा उत्तमरीत्या हाकत त्यांनी अनेक स्पर्धा काबीज केल्या आहेत. श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 40 सुवर्ण 21 रौप्य पदके पटकावली आहेत. आणि आता आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी बाजी मारून महाराष्ट्र पोलीस खात्याच्या इतिहासात सुवर्ण नोंद केली आहे.
“पोलिस दलात रुजू होण्याआधीपासून खेळाची आवड होती, विशेषत: धावण्याची आवड असल्याने हि स्पर्धा यशस्वीरीत्या जिंकली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर पॉवर लिफ्टिंग व वेट लिफ्टिंगमध्ये करिअरला सुरुवात केली. यातही यश मिळाले. मात्र मणक्याचा त्रास सुरू झाला. यामुळे हे खेळ थांबले. शिवाय या काळात लग्नही होऊन नाशिकमध्ये बदलीही झाली. मात्र संसाराचा गाडा हाकत सराव आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणे सुरुच ठेवले. आजही रोज सकाळी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर माझा सराव सुरू असतो. हा आयर्नमॅन पुरस्कार मिळाल्याने खुप आनंदी आहे.” – आश्विनी देवरे, पोलिस नाईक