नाशिक पालिकेतील भाजपची सत्ता धोक्‍यात?

शिवसेनेकडून हालचालींना वेग

नाशिक – राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा येऊनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मित्रपक्ष शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समान वाटा मागितल्याने सध्या भाजप सत्तेपासून दूर आहे. शिवसेना आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्‍यता असल्याने याचा फटका आगामी महापौर निवडणुकीत भाजपला बसू शकतो. त्यातच नाशकात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेने आपले इरादे स्पष्ट केले.

नाशिक महापालिकेत एकूण 122 नगरसेवक आहेत. यापैकी भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने राजीनामा दिल्याने भाजपचे सध्या 65, तर शिवसेनेचे 34 संख्याबळ आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी 6 मनसेचे 5 अपक्ष 3 आणि आरपीआय आठवले गटाचा एक नगरसेवक असे मनपातील पक्षीय बलाबल आहे.सध्या शिवसेनेकडे विरोधीपक्षनेतेपद आहे.

बाळासाहेब सानप यांचा शिवसेना प्रवेश झाल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या जोरावर महापौरपद मिळविण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे. त्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक महिनाच्या अंतराने नाशिक महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक होणार असून आकडेमोड करायला आतापासूनच सुरुवात झाली आहे.

दरम्यान, राजकारणात काहीही होऊ शकते, असा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी देखील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे शिवसेनेला पाठिंबा देतील का? सत्तेच्या सारीपाटात आपली राजकीय कारकीर्द धोक्‍यात घालून किती नगरसेवक बाळासाहेब सानप यांच्या पाठीशी उभे राहतात हे बघणे महत्त्वाचे आहे. कारण यावरच पुढची गणिते अवलंबून आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here