प्रेरणा : हुशार युवकांचे गाव- माघोपट्टी

दत्तात्रय आंबुलकर
उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील माघोपट्टी हे गाव हुशार व कर्तबगार युवकांचे गाव म्हणून आता राष्ट्रीय पातळीवर नावलौकिकास आले आहे. अर्थात यामागची वस्तुनिष्ठ पार्श्‍वभूमी म्हणजे माघोपट्टी यासारख्या लहान गावातून गेल्या काही वर्षांत 50 आयएएस, आयपीएस व राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडीत आहेत.

जिल्हा मुख्यालय जौनपूरपासून केवळ 11 किलोमीटरवर असणाऱ्या माघोपट्टी गावच्या वेशीवर असणाऱ्या स्वागतद्वारापासून गावचे वेगळेपण सांगून जाते. अशा या माघोपट्टी गावात केवळ 75 घरे आहेत. मात्र एवढ्या लहानग्या गावातून 50च्या वर युवक सरकारी अधिकारीपदी विराजमान झाले आहे. माघोपट्टीचे यासंदर्भातील अन्य प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गावचे तरुण-तरुणीच नव्हे तर गावात नव्याने येणाऱ्या सुना पण आता मोठ्या जिद्दीने गावचा कित्ता गिरवित आहेत.

यासंदर्भातील पार्श्‍वभूमी म्हणजे गावाला विविध स्पर्धा परीक्षांतील यशाची यशस्वी परंपरा सुमारे 70 वर्षांहून अधिक आहे. गावस्तरावर उपलब्ध नोंदीनुसार माघोपट्टी गावचे मुस्तफा हुसेन गावातील सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणारे यशस्वी युवा ठरले. आयएएस पात्रताधारकांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे 1952 मध्ये माघोपट्टीचे इंदू प्रकाश सिंह हे प्रथम आयएएस उमेदवार ठरले.इंदू प्रकाश यांनी विविध स्तरांवर प्रशासनिक सेवा दिल्यानंतर विविध देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून ते कार्यरत होते.

इंदू प्रकाश सिंह यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांचे अमिताभ सिंह व जन्येजय सिंह हे दोन्ही पुत्र व सरिता आणि कल्पना या दोन्ही मुलीपण प्रशासनिक सेवेत विविध पदांवर कार्यरत आहेत हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. 1955 च्या आयएएस परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर 13व्या क्रमांकासह यशस्वी झालेले विनयकुमार सिंह या माघोपट्टीचे मूळ निवासी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तर बिहारचे मुख्य सचिव पद भूषविले होते.

1964 मध्ये विनयकुमार सिंह यांचे छत्रपाल सिंह व जयकुमार सिंह हे दोन्ही भाऊ पण आयएएस अधिकारी बनले. यातील छत्रपालसिंह यांनी तामिळनाडूचे मुख्य सचिव म्हणून नावलौकिक कमावला. याशिवाय उत्तर प्रदेशचे माजी नगर विकास सचिव म्हणून निवृत्त झालेले सूर्यप्रकाश हे पण याच माघोपट्टीच्या मातीतून आलेले. माघोपट्टीचे निवासी व आता देश-विदेशात विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम करणाऱ्या निवडक प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आर्थिक सेवा, दूरसंचार, रेल्वे, राजस्व या सहा विभागातच नव्हे तर इस्रो व भाभा अणुशक्‍ती केंद्र इ. ठिकाणी कार्यरत असून आपापल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत.

या साऱ्या मंडळींचे एक समान सामाजिक वैशिष्ट्य म्हणजे कामानिमित्त दूरवर असणारी ही मंडळी वर्षातून एकदा आपल्या मूळ गावी माघोपट्टीला अवश्‍य जातात व गावातील शाळेच्या माध्यमातून तेथील युवकांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी अनुभवी व्यक्‍ती मार्गदर्शन करीत असतात. स्पर्धा परीक्षांचा बाऊ करणाऱ्या आणि या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडे निकृष्ट दर्जाने पाहणाऱ्यांची मानसिकता बदलवण्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे माघोपट्टी गाव होय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here