Nashik Padvidhar Election – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी पक्षासोबत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती. नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने येथून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म असतानाही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपेक्षा उमेदवारी दाखल करत पक्षाला मोठा धक्का दिला. अशातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (ठाकरे गट) नाशिक पदवीधर निवडणुकीत उतरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
याबाबत आजच उद्धव ठाकरे व निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरलेल्या शुभांगी पाटील यांची मातोश्रीवर भेट झाली. या भेटीनंतर शिवसेनेने (ठाकरे गट) पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तांबे यांच्या अनपेक्षित खेळीमुळे चर्चेत आलेली पदवीधरची निवडणूक आता यामध्ये शिवसेनेने घेतलेल्या एंट्रीमुळे आणखी रंगतदार होणार हे स्पष्ट झालंय. ( Nashik Padvidhar Election )
शुभांगी पाटील यांना पाठिंबा देऊन उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना शह?
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी उमेदवारी दाखल करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची फूस असल्याची चर्चा रंगली आहे. उमेदवारी दाखल केल्यानंतर तांबे यांनी देखील भाजपने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी, तांबे यांना पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं दर्शवलं होत.
तांबे यांच्या अचानक एंट्रीमुळे भाजपच्या संभाव्य उमेदवार शुभांगी पाटील यांची मात्र गोची झाली होती. पाटील या काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपमध्ये होत्या.
पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतरही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न केल्याने काँग्रेस आधीच स्पर्धेतून बाद झाली आहे. अशात आता शिवसेनेने या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आहे. भाजप तांबे यांना पाठिंबा देणार असल्याची शक्यता लक्षात घेता शिवसेनेने भाजपच्या संभाव्य उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे तांबेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला असल्याचं बोललं जातंय.