मुंबई – मी भारताची नागरीक आहे. मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला आहे. मी जे कपडे परिधान करते, ते माझ्या आवडीने परिधान करते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही. मी परिधान करत असलेले कपडे हे माझ्या कामाच्या अनुषंगाने परिधान करते. त्यावरून माझे फोटोशूट होत असतात. माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो. त्याचवेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात. हेच फोटो व्हायरल होतात. हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू शकते, असा जबाब उर्फी जावेदने मुंबई पोलीसांकडे नोंदवला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली होती. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलीसांनी उर्फी जावेदला नोटीस बजावली होती. आज हजर राहण्याबाबत उर्फीला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर उर्फीने पोलीस ठाण्यात हजर राहून आपला जबाब नोंदवला आहे.
दरम्यान, गेला काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद प्रकरण चर्चेत आहे. वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे. तर उर्फी जावेदने वेळोवेळी प्रत्युत्तर देऊन चित्रा वाघ यांना चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे ट्विट गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. उर्फी जावेद ही अभिनेत्री आणि माॅडेल आहे. तीने दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी माँ, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय उर्फी ही मॉडेलिंगमध्ये कार्यरत आहे.