नाशिक – पिता-पुत्र आणि सुनबाई एकाच वेळी बारावी पास झाल्याची सुखद घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. त्र्यंबक तालुक्यातील आव्हाटे येथील देहाडे कुटुंबियातील हे तिघेजण एकाच वेळी बारावी पास झाले आहेत. लक्ष्मण देहाडे (वय 48), समीर देहाडे (वय19) अशी या दोघा पिता पुत्राची नावे आहेत. तर ऋतिका जाधव (वय 20) असे सुनबाईचे नाव आहे. समीर हा ऋतिका यांचा दीर आहे. लक्ष्मण यांनी वयाच्या 48 व्या वर्षी परीक्षा दिली. तर त्यांचा मुलासह सुनबाईने देखील परीक्षा पास केली आहे.
अनेकजण वयोवृद्ध असूनही परीक्षा देतात. मला बारावी झाली नसल्याची खंत बोचत होती. मुलगा आणि सुनबाई बारावीलाच होते. त्याने मला परीक्षा देण्यास प्रोत्साहीत केले. त्यानुसार मी फॉर्म भरुन परीक्षा दिली अन पासही झालो, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण देहाडे यांनी दिली आहे.
दरम्यान, या तिघांनी मार्च 2022 मध्ये बारावीची परीक्षा दिली होती. बुधवारी निकाल हाती पडल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. समीर लक्ष्मण देहाडे याला 64 टक्के गुण मिळाले असून त्याचे वडील लक्ष्मण देहाडे यांना 64.50 टक्के गुण मिळाले आहेत तर लक्ष्मण बेर्डे यांची सून ऋतिका बाळू जाधव हिला 55 टक्के गुण मिळाले आहेत. देहाडे कुटुंबाच्या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.