नाशिक – राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीत बहुतांश जागांबाबत एकमत झाले आहे. मात्र नाशिकच्या लोकसभा जागेबाबत तिढा कायम आहे. येथे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, आज नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असा त्यांचा ठाम विश्वास आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की या जागेसाठी महायुतीत माझ्या नावाची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मला उमेदवारी जाहीर झाल्यास मी निवडणुक लढवणार. ( Nashik Lok Sabha Election 2024)
माझ्या नावाची अचानक चर्चा – छगन भुजबळ
माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, लोकसभा उमेदवारीसाठी माझा आग्रह नव्हता. मात्र दिल्लीतील बैठकीत अचानक माझ्या नावाची चर्चा सुरु झाली. मला मुंबईला बोलावण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्या नावाची चर्चा आहे का ? असे विचारले असता त्यांनी हे खरे असल्याचे म्हंटले. त्यामुळे मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच लोकसभा निवडणुक लढवेल, असे भुजबळ म्हणाले. तसेच या जागेवर हेमंत गोडसे यांचा फार आग्रह आहे. मात्र वरिष्ठ जो निर्णय देतील तो मला मान्य असल्याचे भुजबळ म्हणाले. हेमंत गोडसे यांनी उमेदवारीची मागणी केली आहेत. याबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमच्या उमेदवारांची यादी दोन-तीन दिवसांत जाहीर होईल. हेंमत गोडसे यांनी प्रचार सुरू केला असला तर चांगले आहे. त्यांच्या प्रचाराचा महायुतीचा उमेदवार कोणीही असो त्याला फायदा होईल, असा टोला त्यांनी हेमंत गोडसेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे विद्यमान खासदाराला वाऱ्यावर सोडणार नाहीत – गोडसे
एकीकडे अचानक छगन भुजबळांचे नाव नाशिक जागेसाठी चर्चेत आल्याने हेमंत गोडसे यांना तडजोड करावी लागते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपासून हेमंत गोडसे हेच नाशिक जागेसाठी महायुतीचे उमेदवार असतील असे मानले जात होते. वेळोवेळी त्यांच्या नावाला समर्थन पाहायला मिळाले. मात्र आता अचानक छगन भुजबळांचे नाव समोर आले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. शिंदे गटाकडून त्यांचा प्रचार सुरू करण्यात आला आहे.
सब्र का फल मीठा होता हैं… असे म्हणत नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळणार असा दावा हेमंत गोडसे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे हे विद्यमान खासदाराला वाऱ्यावर सोडणार नाहीत. आमचा विचार केला जाईल असेही ते म्हणाले. त्यामुळेच महायुतीमध्ये आता नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांच्या यादीत नाशिकची ही जागा कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नाशिक लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात 30 मे रोजी मतदान होणार आहे तर निकाल 4 जूनला जाहीर होतील.