अकोला – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. ‘सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला तुरुंगात पाठवू’ यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
दरम्यान, अकोला येथील जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलर असून सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांसाठी भाजपनं त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. काँग्रेसने कुणासोबतच आघाडी करु नये यासाठी भाजपनेच खोडा घातला. काँग्रेसनं देशभरात आघाडी का केली नाही ? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आप आघाडीसाठी तयार असताना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यामुळे आघाडी न झाल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. याशिवाय शिला दीक्षित यांचे पुण्याच्या एका भ्रष्टाचारी नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी नाव न घेता सुरेश कलमाडी यांच्यावर टीका केली.”