प. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची सद्यस्थिती

– प्रकाश राजेघाटगे 

महाराष्ट्र राज्य निर्मिती ते नंतर बरीच वर्षे कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष मजबूत किल्ल्यासारखा होता. (मधल्या काळात पुलोदचा प्रयत्न शरद पवारांनी करूनही कॉंग्रेस पक्ष आपली ताकद राखूनच होता.) नंतरच्या काळात मात्र हळूहळू का होईना कॉंग्रेस पक्ष अशक्त होत गेला. पण खऱ्या रीतीने कॉंग्रेस पक्षाची हानी झाली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतरच. नंतर पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाने नंबर एकची जागा पटकावली. तरीही कॉंग्रेस पक्ष काही सहकारातील मातब्बर घराण्यातील नेत्यांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रात टिकून होता, पण 2014 साली झालेल्या लोकसभेनंतर देशाचे चित्रच पालटले. कधी नव्हे ते भाजपा पूर्णं बहुमताने सत्तेवर आला.आता हा उहापोह करण्याचे कारण आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची घटलेली ताकद हा आहे.

प. महाराष्ट्रातील सातारा जिल्हा जसा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसाच यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. यशवंतराव चव्हाण नंतर त्यांचे मानसपुत्र शरद पवारांना या जिल्हाने कायम झुकते माप दिले.राष्ट्रवादीच्या उदयानंतर नऊ आमदार व दोन खासदार या पक्षाला दिले.पण यानंतरही कॉंग्रेस पक्षाने जिल्ह्यात आपले अस्तित्व टिकून ठेवले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उदयानंतर विलासकाका जसे कॉंग्रेसपासून दूर गेले तसेच अतुल भोसले, सुरेंद्र गुदगे गेले. आता तर मदन भोसले, नुकतेच झालेले जिल्हाध्यक्ष रणजित नाईक निंबाळकरही भाजपावासी झाले.यात मित्रपक्षाकडून मिळालेली वागणूक, वरिष्ठ नेतृवाकडून अपुरी ताकद हेच कॉंग्रेस पीछेहाटीचे कारण आहे. सातारा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील हरवलेले हाताचा पंजा चिन्ह हेच उदाहरण पुरेसे बोलके आहे.

सांगली मतदारसंघ वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला होता. सांगली लोकसभा आणि दादा घराण्यातील खासदार असे समीकरण ठरलेले होते. पण मोदी लाटेत हा किल्ला असा काही पडला की,आता वसंतदादांच्या वारसानांही उमेदवारीसाठी स्वाभिमानीच्या वळचणीस जावे लागले ह्यातच कॉंग्रेसचा हतबलपणा दिसून येतो.पतंगराव कदम व दादांच्या घराण्यातील वाद जसा कॉंग्रेसला हानिकारक झाला तसाच भाजपाचा शिरकाव व मित्रपक्षाच्या कुरघोड्या सांगली कॉंग्रेसला हानिकारक आहेत हे सामान्य कॉंग्रेसजन हताशपणे पाहात आहे.

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आर्थिक उत्पन्न असणारा जिल्हा. पण या जिल्ह्यातील सद्यस्थिती कॉंग्रेससाठी फारशी उत्साहवर्धक नाही. सतेज पाटील आणि मुन्ना महाडिक यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मोदी लाटेत महाडिकांसाठी कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटलांनी आघाडी धर्म पाळला.पण सहा महिन्यांत मुन्ना महाडिकांनी आपल्या भावाला भाजपात पाठवून सतेज पाटलांचा पराभव केला. हातकंणगले मतदारसंघात कलाप्पा आवाडेंची तीच अवस्था आहे, मागच्या दोन लोकसभेत हातकंणगले मतदारसंघात आघाडी धर्म पाळला असता तर ते नक्कीच निवडून आले असते. पण तेथेही कॉंग्रेसची राजकीय आत्महत्याच झाली.

वर्तमानात या चारही जिल्ह्यांत पुणे मतदारसंघ वगळता लोकसभेला कॉंग्रेसचे चिन्हच हरवलेले आहे. याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना वैषम्य आहे. याला मित्र म्हणवणारे पक्ष जसे कारणीभूत आहेत, तसे पक्षांर्गत गटबाजीचे राजकारण व अंतर्विरोध व भाजपाने ऐनवेळेस केलेल्या राजकीय खेळ्याही जबाबदार आहेत. यातूनही कॉंग्रेस भरारी घेऊ शकते पण त्यास कठोर निर्णय घेणारे नेतृत्वास संधी दिली पाहिजे नाहीतर स्वर्गातून पश्‍चिम महाराष्ट्रातिल कॉंग्रेस पाहताना यशवंतराव व वसंतदादा यांनाही नक्कीच यातना होतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.