पिंपरी – स्थायी समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष अशा एकूण सोळा सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका भाजपने पहिल्या दिवशीच स्पष्ट केली आहे. भाजपने साडेचार वर्षांत स्वच्छ कारभार केला आहे. भाजपने स्थायी समितीमध्ये उतरत्या दराने कामे केली, तर राष्ट्रवादी चढ्या दराने काम करत होती. चौकशी करायची तर महापालिकेच्या स्थापनेपासून करा. आजपर्यंत झालेल्या स्थायी समितीच्या सर्वच सभापतींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर महापालिकेतील प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलने सुरू केली आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेकडून सुरू असलेल्या आंदोलनावरून भाजपाचे महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वरील मागणी केली.
पुढे ढाके म्हणाले, स्थायी समिती संदर्भातील उपस्थित झालेला विषय हा संपूर्ण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा भाग आहे. स्थायी समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष अशा एकुण सोळा सदस्यांचा समावेश आहे. हा सुध्दा चौकशीचा भाग आहे. संबंधित विभाग याबाबत चौकशी करीत आहे. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केलेली आहे.
पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पार्टीने संपूर्ण शहराचा विचार करून योग्य प्रकारे विकास कामांचे नियोजन केले. त्यातून पालिकेचा निधी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. या पाच वर्षांच्या काळात भाजपाने स्थायी समितीमध्ये उतरत्या दराने विकासकामे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची बचत झाली आहे. उलट राष्ट्रवादीच्या काळातील निविदा चढ्या दराने असून त्यांच्या काळात पालिकेची लूट झाली आहे. याचा हिशोब राष्ट्रवादीने सर्वसामान्यांना द्यायला हवा.
राजकीय षडयंत्र
महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली आहे. ही संपूर्ण कारवाई म्हणजे राजकीय षडयंत्र आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येणार असून, त्याद्वारे सत्य उजेडात येईल, असा दावाही ढाके यांनी यावेळी बोलताना केला.