पिंपरी – वाहन चोरी तसेच मोबाइल चोरीच्या घटना पाठोपाठ घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात एकाच दिवशी बुधवारी (दि. 25) तब्बल सहा घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घरफोडीच्या पहिल्या गुन्ह्यात अरिफा अन्वर तडवी (वय 26, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरिफा यांचे घर 15 ऑगस्टला रात्री दोन ते अडीचच्या सुमारास कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून हेडफोन, इस्त्री, कॅमेरा, लेन्स, कॅमेऱ्याची बॅग, मेमरी कार्ड, चार्जर, बॅटरी व रोख रक्कम, असा 38 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
घरफोडीच्या दुसऱ्या घटनेत प्रदीप मल्हाराव ढोले (वय 43, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी ढोले यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून पाच लाख 98 हजार 500 रुपये किमतीचे 261 ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे शिक्के चांदीची भांडी व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. घरफोडीचा प्रकार रविवार (दि. 22) ते मंगळवार (दि. 24) दरम्यान घडला.
घरफोडीच्या तिसऱ्या गुन्ह्यात लवकुश घनशाम चव्हाण (वय 27, रा. चक्रपाणी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी चव्हाण यांची इंद्रायणीनगर, भोसरी येथे लल्लू पान शॉप नावाची टपरी आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या टपरीची कडी तोडली. तीन हजार 941 रुपये किमतीची पाकिटे व रोख रक्कम चोरट्यांनी टपरीमधून चोरून नेली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते 6 ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या दरम्यान घडली.
घरफोडीच्या चौथ्या गुन्ह्यात रमेश बाळू बोराटे (वय 44, रा. मोशी गावठाण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी बोराटे यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून आठ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 13 ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या
दरम्यान घडली.
घरफोडीच्या पाचव्या गुन्ह्यात साहिल सेजय धुमाळ (वय 18, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी धुमाळ यांचे किवळे येथे एसडी कलेक्शन मेन्स वेअर नावाचे कपड्यांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरची कडी तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून एक लाख 65 हजार 750 रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री नऊ ते बुधवारी (दि. 25) सकाळी दहाच्या दरम्यान घडली. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
घरफोडीच्या सहाव्या गुन्ह्यात रवींद्र डिगंबर पाटील (वय 48, रा. दत्तनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांचे घर मंगळवारी (दि. 24) सकाळी 11 ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून दोन लाख 65 हजार रुपये किमतीचे 70 ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
पोलिसांच्या रात्र गस्तीबाबत प्रश्नचिन्ह
एमटीएममधील चोऱ्या वाढल्याने पोलिसांना त्याकडे जादा लक्ष देण्यास सांगितण्यात आल्याने पुर्वी गल्लीबोळातून होणारी गस्त जवळपास बंदच झाली आहे. याचाच फायदा चोरट्यांनी उचलल्याचे दिसून येत आहे. शहरात घडणाऱ्या बहुतांशी चोरीच्या घटना या रात्रीच्यावेळी होत आहेत. तसेच वाहन चोरीदेखील रात्रीच्यावेळी होत आहे. पहाटेच्या सुमारास मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
==================