ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा ः आमदार बेनके यांची माहिती
ओतूर येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता
शिरोली बुद्रुक व आळेफाटा येथे आठ दिवसांत करोना सेंटर
नारायणगाव (वार्ताहर) –ओतूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता मिळाली आहे. याठिकाणी सुसज्ज अशी बहुमजली इमारत होणार असून नवीन पद्धतीने एक आरोग्यसेवा असलेले मॉडेल तयार होणार आहे. या केंद्रासाठी राज्य शासनाने 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली असून या ठिकाणी 100 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल होणार आहे, अशी माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
नारायणगाव विश्रामगृहात मंगळवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत आमदार अतुल बेनके हे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, तहसीलदार हनमंत कोळेकर, गट विकास अधिकारी हेमंत गरीबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे आदी उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले, जुन्नर तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांसाठी 1 हजार 14 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ दिवसांत शिरोली बुद्रुक आणि आळेफाटा येथे 70 बेडची संख्या वाढणार आहे. विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या प्रयत्नामुळे लवकरच शिरोली बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणाऱ्या केंद्रात लवकरच 40 बेड उपलब्ध होईल. सध्या जुन्नर तालुक्यात 1 हजार 14 बेडची क्षमता आहे, त्या मध्ये 201 ऑक्सिजन बेड आहेत तर आयसीयु बेड 43 आणि 11 व्हेंटिलेटर आहेत. आणखी 200 ते 250 बेड वाढविण्याचा प्रयत्न आहे. येत्या आठ दिवसांत शिरोली बुद्रुक व आळेफाटा येथे करोना सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
जुन्नरकरांना मिळणार ऍपद्वारे माहिती
तालुक्यात करोना उपचारासाठी रुग्णांना बेडची माहिती व्हावी यासाठी बोरी गावचे सुपुत्र असलेले संगणक तज्ञ सचिन जाधव यांनी जुन्नर केअर ऍप सर्वांच्या सेवेसाठी तयार केले आहे. या ऍपमध्ये जुन्नर तालुक्याची कोविड 19ची एकूण आकडेवारी, कोविड बेड्सची उपलब्धता, सध्याची रुग्णांची संख्या व कोविडशी संबंधित सर्व उपयुक्त माहिती फक्त एका क्लिकवर समस्त जुन्नरकरांच्या सेवेसाठी मोफत तयार केले आहे.
आरोग्य प्रशासनात समन्वयाचा अभाव
प्रशासन व सेवाभावी संस्था या चांगल्या पद्धतीने काम करीत आहे; मात्र काही प्रमाणात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात सेवा चांगली मिळत नाही, अशा तक्रारी आल्यानंतर आपण स्वतः येथे प्रत्यक्ष पाहणी केली आणि अधिकारी वर्गास योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यापुढे सर्वांनी समन्वय साधून रुग्णांना चांगली सेवा द्यावी असे अशी सूचना त्यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यासाठी जाहीर झालेल्या यादीनुसार काही खासगी डॉक्टर येत नाहीत. याबाबत डॉक्टरांशी संवाद करून अडचणी समजून घेऊ, खासगी डॉक्टर आरोग्य सेवा देण्यास हलगर्जीपणा व कुसूर करीत असतील तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविले जातील.