बलात्कार प्रकरणात नारायण साई दोषी

सूरत सत्र न्यायालयाचा निर्णय : 30 एप्रिलला होणार शिक्षेची सुनावणी
सुरत (गुजरात) – बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याच्यासह तीन आरोपींना सूरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार आहे. सुरतच्या जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेने नारायण साईवर बलात्काराचे आरोप केले होते. ज्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. पोलिसांनी साधिकेचा जबाब आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर नारायण साईविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हा निर्णय न्यायालयाने पाच वर्षांनी सुनावला आहे. 2002 मधील आरोपांनुसार, नारायण साईने सुरतमधील जहांगीरपुरा आश्रमातील साधिकेवर बलात्कार केला होता. त्यानंतर 2004पर्यंत सातत्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. यानंतर 6 ऑक्‍टोबर 2013 रोजी पीडितेने नारायण साई, गंगा, जमुना, हनुमान आणि इतर सात जणांवर सुरतमध्ये फिर्याद दिली होती.

साधिकेने आपल्या जबाबात नारायण साईविरोधात सबळ पुरावे दिले होते. नारायण साईविरोधात न्यायालयाने आतापर्यंत 53 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी काहींनी या दोन्ही बहिणींवर अत्याचार करताना पाहिल्याचे म्हटले आहे. तर ज्यांनी या कृत्यात आरोपींची मदत केली होती, ते आता साक्षीदार बनले आहेत.

दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी नारायण साई सातत्याने आपले ठिकाण बदलत होता. सुरतचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी नारायण साई यांना अटक करण्यासाठी 58 विविध पथकं बनवून शोध सुरु केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यानंतर 4 डिसेंबर, 2013 मध्ये नारायण साईला हरियाणा-दिल्ली सीमाजवळ अटक करण्यात आली. याशिवाय कारागृहात असताना पोलीस कर्मचाऱ्याला 13 कोटी रुपयांची लाच देण्याचा आरोपही नारायण साईवर लागला होता. पण या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.