मुंबई- राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. करोनाचा विषय काही प्रमाणात कमी होताच आता राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवल्यापासून भाजप आक्रमक झाले आहे. तर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी अनेक नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या. त्यावरून भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र संभाजी राजे यांच्यावर टीका करत आहे. या टीकेला आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राजेंसोबत प्रजा दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून शिवसेनेने राणे यांच्यावर टीका केली. संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व आहे, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
नारायण राजे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत असतात. तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही. संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधीही होऊच शकत नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी संभाजीराजेंचा आदर्श घेतलाच पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली.
दरम्यान भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी एकीकडे भाजपचेच खासदार असलेले संभाजीराजे नवे आंदोलन उभे करत आहेत, तर दुसरीकडे नारायण राणे संभाजीराजेंच्या भूमिकेवर संशय घेत आहेत, असे विनायक राऊत म्हणाले.