मुंबई – श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी देशातून पळ काढल्याची तपास यंत्रणांना माहिती मिळाली. आयकर विभाग आणि ईडी 9 महिन्यांपासून चतुर्वेदीच्या मागावर आहेत. तसेच कारवाईच्या भीतीने तो भारत सोडून आफ्रिकन देशात पसार झाल्याची प्राथमिक माहिती समजते.
गेल्या काही महिन्यांपासून नंदकिशोर चतुर्वेदी हा देश आणि मुंबई सोडून आफ्रिकेच्या एका देशात राहत आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर नंदकिशोर चतुर्वेदी हा रडारवर आला. मागील 9 महिन्यांपासून आयटी आणि ईडी नंदकिशोर चतुर्वेदीच्या मागावर आहेत. या व्यक्तीच्या नावावर अनेक शेल कंपन्या आहेत. शेल कंपन्यांमार्फत हवाला पैसा जमा करण्याचं काम याच्याकडेच आहे.
विशेष म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी हा सीए आहे. नंदकिशोर चतुर्वेदीचे ठाकरे परिवाराशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. चतुर्वेदीची ईडी आणि आयटीकडून चौकशी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो देश सोडून गेल्याचे सांगितले जात आहे.