अबुधाबी – नवख्या नामिबीयाने नेदरलॅंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशाही कायम राखल्या.
नामिबीयाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलॅंडच्या फलंदाजांनी अननुभवी गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करताना 4 गडी गमावून 164 धावा केल्या. हे आव्हान नामिबीयाने 4 गडी गमावून 19 व्या षटकातच पूर्ण केले व विजयासह स्पर्धेतील आव्हानही कायम राखले.
नेदरलॅंडच्या मॅक्स ओडाउड आणि स्टीफन मायबर्ग या सलामीवीरांनी 42 धावांची सलामी दिली. मायबर्ग 17 धावांवर बाद झाला. मात्र, ओडाउडने जबाबदारीने फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 70 धावांवर बाद झाला. त्याने 56 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर वॅन डर मर्वनेही निराशा केली. बाद होण्यापूर्वी ओडाउडने कोलीन ऍकरमनच्या साथीत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. मात्र, हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. मॅक्स बाद झाल्यावर ऍकरमनही फार काळ तग धरू शकला नाही. त्याने 35 धावा केल्या.
मात्र, स्कॉट एडवर्डने आक्रमक 21 धावांची नाबाद खेळी करताना संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. या धावसंख्येचा पाठलाग करताना नामिबीयाच्या प्रमुख फलंदाजांनी जरी निराशा केली असली तरीही त्यांच्या डेव्हिड विसने 40 चेंडूत 66 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सलामीवीर स्टिफन बार्ड आणि झेन ग्रीन यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, दे दोघेही स्थिरावलेले असताना बाद झाले. क्रेग विल्यम्सने साफ निराशा केली.
गेरहार्ड इरासमसने डेव्हिड विसला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. इरासमस 32 धावांवर बाद झाल्यावर विसने जेजे स्मिथला साथीला घेत संघाचा विजय साकार केला. विस 66, तर स्मिथ 14 धावांवर नाबाद राहिले.
संक्षिप्त धावफलक –
नेदरलॅंड – 20 षटकांत 4 बाद 164 धावा. (मॅक्स ओडाउड 70, कोलीन ऍकरमन 35, स्कॉट एडवर्ड नाबाद 21, जेन फ्रॅंकलिन 2-36). नामिबीया – 19 षटकांत 4 बाद 166 धावा. (गेरहार्ड इरासमस 32, डेव्हिड विस नाबाद 66, जेजे स्मिथ नाबाद 14, पीटर सिल्लर 1-8, फ्रेड क्लासेन 1-14).