अबुधाबी -फलंदाजीसह गोलंदाजीतही सरस कामगिरी करताना श्रीलंकेने आयर्लंडचा 70 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या सुपर 12 गटात स्थान मिळवण्याच्या आशाही वाढवल्या आहेत.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. श्रीलंकेच्या वेगवान तसेच फिरकी गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. अँड्य्रू बिलबर्नने 41 तर, कर्टिस कॅंफरने 24 धावांची खेळी केली. मात्र, त्यांना अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेचा ऑफ स्पीन गोलंदाज महिश तिक्षीणाने 3 गडी बाद करताना त्यांची मधळी फळी अडथळा ठरणार नाही याची काळजी घेतली. मध्यमगती गोलंदाज लाहिरू कुमारा व चामिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तसेच वनिंदू हसरंगा व दुष्मत चमिरा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात मूळचा गोलंदाज असलेल्या वनिंदू हसरंगा याने अफलातून आक्रमक खेळी केली. त्याच्यासह सलामीवीर पाथुम निसांकानेही अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे श्रीलंका संघाने आयर्लंडसमोर विजयासाठी 172 धावा करण्याचे आव्हान ठेवले. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाच्या अवघ्या 8 धावा झालेल्या असताना त्यांचे तीन फलंदाज बाद झाले होते. त्यामुळे त्यांचा डाव संकटात सापडला होता. मात्र, सलामीवीर निसांकाने गोलंदाज असूनही फलंदाजीत बढती दिलेल्या हसरंगाच्या साथीत संघाचा डाव सावरला. या जोडीने आक्रमक फलंदाजी करताना आयर्लंडच्या गोलंदाजांवर दडपण आणले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 123 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, हसरंगाने आपले अर्धशतक साकार केले. त्या पाठोपाठ निसांकानेही अर्धशतकी पल्ला गाठला. हसरंगा अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने आपल्या 71 धावांच्या खेळीत 47 चेंडूत 10 चौकार व 1 षटकार फटकावला. कुशल परेरा, अविष्का फर्नांडो व दीनेश चंडीमलने निराशा केली. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षे व चामरा करुणारत्ने यांनाही अपयश आले. मात्र, निसांका एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याने कर्णधार दासून शनाकाच्या साथीत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. निसांका 47 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 61 धावा काढून बाद झाला. शनाका 21 धावांवर नाबाद राहिला. आयर्लंडकडून जोशुआ लिटीलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मार्क अदीरने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका – 20 षटकांत 7 बाद 171 धावा. (वनिंदू हसरंगा 71, पाथुम निसांका 61, दासून शनाका नाबाद 21, जोशुआ लिटील 4-23, मार्क अदीर 2-35). आयर्लंड – 18.3 षटकांत सर्वबाद 101 धावा. (अँड्य्रू बिलबर्न 41, कर्टिस कॅंफर 24, महिश तिक्षीणा 3-17, लाहिरू कुमारा 2-22, चामिका करुणारत्ने 2-24).