कराड उत्तरमध्ये विधानसभेसाठी चाचपणी
कराड – राज्यात विधानसभेच्या रणधुमाळीची सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस उरले असताना कराड उत्तर विधानसभा मतदार संघात रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी बैठका धडका सुरु केला आहे. कोणत्याही परिस्थितीत कराड उत्तर मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्धार या बैठकीत कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे कराड उत्तरमध्ये रयत क्रांतीचे नेते सचिन नलवडे यांनी जर निवडणूक लढवल्यास त्यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळेल हे निश्चित मानले जात आहे.
नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून शेतकऱ्यासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून सचिन नलवडे यांची ओळख आहे. त्यांच्यावर या आंदोलनामुळे कित्येक गुन्हे दाखल आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी निवडणूक लढवावी, अशी भावना शेतकऱ्यांची असून ते यासाठी आग्रही आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुसेसावळी, रहिमतपूर, किवळ, चोराडे, म्हासुर्णे, टेंभू, शामगाव, राहटणी, शिरवडे, वाघेश्वर आदि गावांसह इतर गावात बैठका झाल्या असून रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी निवडणूक लढवावी असा एकच सूर निघत आहे.
सचिन नलवडे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी कराड तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोठी चळवळ उभी केली होती.
त्यातून त्यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामध्ये थकित ऊसबील, ऊसदर आंदोलन, रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी, धरणग्रस्त पुनर्वसन लोकांना न्याय, दुष्काळ भागाला नुकसान भरपाई, कॅनॉलला पाणी सोडण्यासाठी आंदोलन, विज वितरण कंपनीशी संबंधित प्रश्न, शेतकऱ्यांची महसुली विभागातील कामे आदींसह ऊस एफआरपीचे यशस्वी आंदोलन केली आहेत. या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला असल्याने कोणत्याही परिस्थितीत सचिन नलवडे हा आपला हक्काचा आणि शेतकऱ्यांचा आमदार होण्यासाठी गावोगावचे कार्यकर्ते बैठकीचे आयोजन करत आहेत.
यापूर्वीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलन उपोषण, बैठका, निवेदने, चर्चा करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे लोकांचा उमेदवारीसाठी मोठा आग्रह होत आहे. त्यामुळे भागातील सर्व गावात माझ्या बैठका सुरु आहेत. शेतकरी जो निर्णय घेतील तो मी तंतोतंत पाळण्यास कटिबद्ध आहे.
सचिन नलवडे,रयत क्रांती शेतकरी संघटना