13 संवर्गाची परीक्षा अजूनही बाकी । प्रतीक्षा पुढील वेळापत्रकाची
नगर – बहुप्रतीक्षेनंतर एकदाची जिल्हा परिषदेची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. सहा संवर्गाच्या ऑनलाइन परीक्षा देखील झाल्या होत्या. असे असतांना अचानक ही प्रकीया स्थगित करण्यात आल्याने आता उर्वरित संवर्गाच्या परीक्षा होणार की नाही. तसेच संपूर्ण जिल्हा परिषद नोकरभरतीच रद्द होणार यासारखे प्रश्न उमेदवारांना पडू लागले असून त्यांच्या संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा परिषदेने केवळ परीक्षा स्थगित केल्याचे म्हटले आहे. पण का व कशासाठी हे कारण न सांगितल्याने सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यात 19 संवर्गातील 937 पदांसाठी भरती प्रक्रीय सुरू झाली होती. त्यासाठी 44 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर तब्बल महिन्याभराने ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तेही टप्प्या- टप्प्याने करण्यात आले होते. आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया सुरू झाल्याचे उमेदवारांना वाटले. 7 ऑक्टोबरपासून ही परीक्षा प्रक्रीया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात दि.7 ते 11 अशा चार दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले. यात केवळ आठ संवर्गातील परीक्षा झाली. तोपर्यंत पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. अखेर दुसऱ्या टप्प्यातील 15 ते 23 ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. यातील 17 ऑक्टोबरपर्यंत पेपर झाले, परंतु अचानक पुढील परीक्षा रद्द होत असल्याचे कंपनीने कळवल्याने उमेदवारांचा गोंधळ उडाला.
दि. 18 ते 23 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या लिंकवरून पुढील परीक्षांचे प्रवेशपत्रही डाऊनलोड होत नाही. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिकच बंद करण्यात आली असल्याने राज्यात सर्वच जिल्हा परिषदांमधील पुढील पदांची परीक्षा तूर्तास स्थगित झाली आहे. आतापर्यंत केवळ 6 संवर्गातील परीक्षा झाली आहे. अजून 13 संवर्गाची म्हणजे 70 टक्के भरती बाकी आहे. यात मुख्यसेविका, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अशा मोठ्या पदांचे संवर्ग बाकी आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती होण्यास अजून किती दिवस लागणार,याची धास्ती अर्ज केलेल्या उमेदवारांना लागली आहे.
जि.प.च्या पदभरतीचे ग्रहण काही सुटताना दिसत नाही. दुसऱ्यांदा परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा पुरता गोंधळ उडाला आहे. नियोजित परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, पुढील वेळापत्रक प्राप्त होताच कळवले जाईल, असा खुलासा जि.प संकेतस्थळावर करण्यात आला आहे.