सुविधांचा अभावामुळे रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित
पाथर्डी – येथील उपजिल्हा रुग्णालयात शंभर बेडची सुविधा उपलब्ध करून दर्जा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर व शहानवाज शेख यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली.
पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका असून लोकसंख्या जवळपास दोन लाख आहे. ग्रामीण भागाचा विचार करता डोंगर दऱ्यात असलेल्या या तालुक्यात वैद्यकीय अद्ययावत सोईसुविधांचा अभाव आहे. तालुक्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय हे पाथर्डी शहराच्या ठिकाणी आहे. येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अतिशय कमी बेड आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार घेणे हे फार कठीण झाले असून अनेक गरजू रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेतात.
त्यामुळे बऱ्याच रुग्णांना आरोग्य सेवापासून वंचित राहून आर्थिक बोजा सोसावा लागत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने तोकडी आरोग्य सेवा असून परिपूर्ण आरोग्य सेवेसाठी वाढीव बेडच्या सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
पाथर्डी तालुका हा मोहटादेवी, मढी, वृध्देश्वर, आनंदऋषीजी महाराज, भगवानगड, कानिफनाथ मढी या तिर्थक्षेत्रांना सलग्न असून राज्यातून लाखो भाविक येथे येत असतात. वैद्यकीय सुविधा व जास्तीचे बेड याची या रुग्णालयात गरजेचे असून तालुक्यातील जनतेसह तिर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांना उपचारासाठी वैद्यकीय सेवा मुबलक प्रमाणात मिळत नाहीत.