पाथर्डी – संबळ आणि झांजच्या तालावर जमलेल्या भक्तगण, पुजारी व मानकऱ्यांनी आई राजा उदो उदो, मोहटा देवी की जय असा गजर करीत मोहटा गडावर घटस्थापना केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व नीता गोसावी यांचे हस्ते घटस्थापना झाली.
सकाळी मोहटे गावापासून देवीचे सुवर्ण अरलंकार सोन्याच्या मुखवट्याची वाजत गाजत देवी गडापर्यंत मिरवणूक निघाली. रेणुका विद्यालयाचे लेझीम पथक, दांडिया पथकासह विविध पथके मिरवणुकीत सहभागी झाले. मुखवटा मिरवून गाभाऱ्यात येतात उपस्थित हजारो भाविकांनी जय जयकार करीत संबळ वाद्यांच्या गजरात देवीचे स्वागत केले.
उस्फूर्तपणे सर्वांनी दोन्ही हात जोडून पुष्पवृष्टी केली. वेदशास्त्र संपन्न भूषण साकरे, भास्कर देशपांडे व बाळासाहेब क्षीरसागर या ब्रह्मवृंदांनी वेदमंत्राचारात पूजा विधी करून घटस्थापना केली. त्यानंतर आरती करण्यात येऊन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी पाथर्डीच्या न्यायाधीश अश्विनी बिराजदार, विश्वस्त ऍड. कल्याण बडे, शशिकांत दहिफळे, ऍड. विक्रम वाडेकर, अनुराधा केदार, डॉ. श्रीधर देशमुख, श्रीराम परत आदि विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीशांनी यात्रा कालावधीत गाभारा दर्शन बंद केल्याने भाविकांना विना अडथळा थेटपणे देवीचे दर्शन घेता येणार आहे. घटस्थापनेच्या दिवशीच भाविकांचा व ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्रभर देवी गडाकडे येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून ज्योत पेटवून घेणारे मंडळे, पायी चालणारे भाविकांचे गट यामुळे रात्रभर पाथर्डी शहरातही नवरात्रमय वातावरण झाले. यंदा विश्वस्त मंडळाने दर्शन रांगेची सोय अधिक सुलभ केल्याने कितीही गर्दी असली तरी नारळ गेटपासून पायऱ्या चढून भाविक अवघ्या दहा मिनिटात दर्शन घेऊन बाहेर पडणार आहे.
विविध भाविकांकडून गाभाऱ्यामध्ये दररोज फुलांची आकर्षक सजावट सेवा कार्य म्हणून केली जाते. आजची सजावट पिंपरी चिंचवडचे नगरसेवक संगीता भोंडवे व उद्योजक राजेंद्र भोंडवे यांच्याकडून सेवा म्हणून सजावट कार्य केले गेले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 200 पोलीस, होमगार्ड ,पोलीस मित्र असा मोठा फौज फाटा तैनात असून सर्वत्र सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरे कार्यरत आहेत.