गुहा गावासह परिसरातील हिंदूत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध
कोल्हार – राहुरी तालुक्यातील गुहा येथे असलेले कानिफनाथ मंदिर आणि यावरून सुरु असलेले दोन गटातील तणावपूर्ण वातावरण हे संपूर्ण राज्यभर गाजत असताना समाजवादी पार्टीचे आबू आझमी यांनी आज गुहा गावात असलेल्या या धार्मिक स्थळला भेट देण्याचा केलेला प्रयत्न यावरून मोठा तणाव निर्माण झाला. गावकरी आणि हिंदू बांधवांनी आझमी यांच्यासह प्रशासनाला देखील विरोध दर्शवला. अखेर संगमनेरमध्ये आजमी यांना पोलिसांनी रोखले. त्यांना गुहा गावात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील गुहा येथे एका गटाने कानिफनाथ मंदिरात पूजा आणि भजन करण्यासाठी मंदिरात गेलेल्या ग्रामस्थ आणि पूजाऱ्यांना मारहाण केली होती. याचे तीव्र पडसाद लगेचच संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभर उमटले आहेत. ही घटना दोन समाजात तेढ निर्माण करणारी असल्याने राहुरी पोलिसांनी तात्काळ दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या ठिकाणी भेट देण्यासाठी समाजवादी पार्टीचे आबू आझमी हे गुहा गावात भेट देणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी गुहा गावासह संपूर्ण परिसरात पसरली.
आझमी यांना गुहात येण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील हिंदुत्ववादी संघटना व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. मात्र सुरक्षा आणि दोन धर्मात तेढ निर्माण होऊ नये, या उद्देशाने अबू आझमी यांना पोलिसांनी संगमनेरमध्येच रोखून धरल्याने प्रकरण शांत झाले असून, संबंधित ठिकाणी कानिफनाथ महाराजांचे मंदिर आहे, मात्र या मंदिराला दर्गा म्हणणाऱ्या कुणालाही गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशी ठोस भूमिका ग्रामस्थांनी घेतली.