पिंपळे गुरव – साठ फुटी रोडवरील मोरया पार्क लेन नंबर 2 मधील रस्त्याच्या कामाला महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत तब्बल तीन वर्षांनंतर अखेर मुहूर्त लागला. या वेळी महापालिकेचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी परिसरात येताच येथील नागरिकांनी घेराव घालून ड्रेनेजलाइन, पाण्याचे प्रश्न, रस्त्याची उंची याबाबत तक्रारी करून व्यथा मांडल्या.
पिंपळे गुरव येथील मोरया पार्क लेन नंबर 2 परिसर हा गेली तीन वर्षे समस्यांच्या विळख्यात होता. रस्त्याची दुरवस्था होऊन अक्षरशः चाळण झाली होती. सर्वत्र खडी, दगडे पसरल्याने येथील अंतर्गत रस्ता धुळीने माखला होता. अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरची गळती होणे, चेंबर तुंबने, चेंबरमधील तुंबलेले पाणी रस्त्यावर पसरणे, पाण्याच्या पाइपलाइन मधून अस्वच्छ पाणी येत असल्याचे आदी तक्रारी संबंधित महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर यांना परिसरातील नागरिक गराडा घालून व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.
या वेळी महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी येत्या पंधरा दिवसांत येथील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करून पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच खोदकाम सुरू असताना ड्रेनेज चेंबरची गळती, पाण्याची पाइपलाइन चेक करून दुरुस्तीची कामे आढळल्यास ती त्वरित करून कामकाज करताना घेतली जातील, अशी माहिती याप्रसंगी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी येथील परिसरातील नागरिकांना दिली.
या रस्त्याच्या संबंधी वारंवार अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊनही अधिकारी वर्ग मात्र सतत केराची टोपली दाखवीत होते. पिंपळे गुरव परिसर स्मार्ट झाला आहे, मात्र आम्ही नेमके स्मार्ट परिसरात रहात आहोत की नाही हेच समजत नव्हते. गेली तीन पावसाळ्यात येथील परिसरातील नागरिकांचे हाल झाले. पावसाळ्यात इमारतीच्या पार्किंगमध्ये, बैठ्या घरांमध्ये, पाणी शिरून खूप मोठे नुकसान झाले. याची महापालिकेकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.
मी ड्रेनेज विभागात येऊन चार महिने झाले आहे. तरी येथील रस्त्याची माहिती घेतल्यानंतर सदर रस्त्यावरील निम्म्याच्या पुढे पाइपलाइन नव्याने टाकून देणार आहोत. त्यानंतर स्थापत्य विभागाकडून डांबरीकरण करण्यात येईल.
– वंदना मोरे, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग.
शनिवारी येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी एक फुटापर्यंत खोदकाम करून त्यावर दोन लेअर देणार आहोत. त्यानंतर त्वरित डांबरीकरण केले जाईल. यासाठी तीन आठवडे कामकाज पूर्ण करण्यास लागणार आहेत.
– स्वप्नील शिर्के, जे. ई.
खूप वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नक्कीच आनंद होत आहे. मात्र ही कामे संथ गतीने न होता त्वरित पूर्ण करण्यात यावीत. यासाठी आम्ही नागरिक सहकार्याची भूमिका घेत आहोत.
– कल्पना घारु, स्थानिक नागरिक.
पावसाळ्यात येथील परिसरातील नागरिकांच्या घरात, इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरत होते. शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना खूप कसरत करावी लागत होती. विकासाची कामे जरूर करा मात्र नागरिकांना त्रास होणार नाही याची अधिकार्यांनी दखल घेणे अत्यावश्यक आहे.
– अक्षता शेट्टी, स्थानिक नागरिक.