नगर -महापालिका कर्मचारी पतसंस्थेत वस्तू कर्जवाटपात 45 लाख रुपयांचा अपहार झाला असून, सभासदांची फसवणूक करणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संबंधित ज्वेलर्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या सभासदांनी केली आहे.
याबाबत संस्थेचे सभासद विजय चव्हाण, संजू उमाप, सोमनाथ गायकवाड, मच्छिंद्र साबळे, साहेबराव बोरगे, संजय बोरगे, विजय घोरपडे, ज्ञानेश्वर मगर, देवीदास जाधव, वसंत कांबळे, शाम घोरपडे, विजय ठोकळ यांच्यासह सभासदांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले की, मनपा कर्मचारी पतसंस्थेत सभासदांना वस्तू कर्जवाटप सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांनी वस्तू कर्जासाठी मागणी केली. पतसंस्थेत सरसकट सर्व वस्तू कर्ज संबंधित ज्वेलर्स यांच्याकडे घेण्याची सक्ती केली. मंजूर कर्ज रु. 90 हजार रकमेपैकी 13 हजार कापून घेऊन सभासदास 77 हजार रोख दिले गेले. वस्तू घेण्यासाठी दुसऱ्या दुकानाचे कोटेशन घेऊन येतो म्हणालो तर कर्ज मिळणर नाही असे, सुनावले आणि मंजूर रकमेतील 13 हजार रुपये कशाचे वजा करता अशी विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास नकार दिला. सोन्याच्या वस्तूवर जीएसटी कर हा 3 टक्के असून, 90 हजारांवर 3 टक्के प्रमाणे 2 हजार 700 रुपये टॅक्स लागत आहे. तसे न करता 13 हजार रुपये हे संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक व उपाध्यक्ष यांनी संगनमताने सभासदांची आर्थिक लूट केली.
संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व ज्वेलर्सचे मालक यांनी फसवणूक करून सुमारे 35 ते 45 लाख रुपये रकमेचा अपहार केला आहे. तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मागासवर्गीय चतुर्थ श्रेणीतील लोकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.